श्री गणेश आरती
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची|
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची ॥ १ ॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥ धृ ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया ॥ २॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥ ३ ॥
श्री शंकर आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥१॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ ४ ॥
श्री दुर्गा देवी आरती
दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां ।
क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
श्री विठ्ठल आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामाङ्गी रखुमाईदिसे दिव्य शोभा ।
पुण्डलिकाचे भेटि परब्रह्म आले गा
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ॥धृ०॥
तुळसीमाळा गळा कर ठेऊनी कटी
कासे पीताम्बर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी
गरुड हनुमन्त पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्रपाळा
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा
ओवाळिती राजा विठोबा सावळा ॥३॥
ओवाळू आरत्या कुरवण्ड्या येती
चन्द्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिण्ड्या पताका वैष्णव नाचती
पण्ढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती
चन्द्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शन होळामात्रे तया होय मुक्ति
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥
श्री महालक्ष्मी आरती
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससि व्यापकरूपे तु स्थूलसूक्ष्मी ॥धृ०॥
मातुलिंग गदा खेटक रवीकिरणी ।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥ २ ॥
तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पदमावती निजधर्माचारी ॥ ३ ॥
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारी।
मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हे रुप चिद्रूप दावी निर्धारी ॥ ४ ॥
चतुरानने कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी।
पुसोनि चरनातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ ५ ॥
श्री दत्त गुरु आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
श्री साईबाबा आरती
आरती साईबाबा, सौख्यदातारा जीवा ।
चरणा रजतळीं, द्यावा दासा विसांवा, भक्ता विसांवा ।। आरती साईबाबा ।। १ ।।
जाळूनिया अनंग, सस्वरुपी राहे दंग ।
मुमुक्षुजना दावी, निज डोळा श्रीरंग, डोळा श्रीरंग ।। आरती साईबाबा ।। २ ।।
जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव ।
दाविसी दयाघना, अशी तुझी ही माव, तुझी ही माव ।। आरती साईबाबा ।। ३।।
तुमचे नाम ध्याता, हरे संसृती व्यथा ।
अगाध तव करणी, मार्ग दाविसी अनाथा, दाविसी अनाथा ।। आरती साईबाबा ।। ४।।
कलियुगी अवतार, सगुणब्रह्म साचार ।
अवतीर्ण झालासे, स्वामी दत्त दिगंबर, स्वामी दत्त दिगंबर ।। आरती साईबाबा ।। ५ ।।
आठा दिवसा गुरुवारी, भक्त करिती वारी ।
प्रभुपद पाहावया, भव भय निवारी, भय निवारी ।। आरती साईबाबा ।। ६ ।।
माझा निजद्रव्य ठेवा, तव चरणरज सेवा ।
मागणे हेचि आता, तुम्हा देवाधी देवा, देवाधी देवा ।। आरती साईबाबा ।। ७ ।।
इच्छित दिन चातक, निर्मल तोय निज सुख ।
पाजावे माधवा या, सांभाळ आपुली भाक, आपुली भाक ।। आरती साईबाबा ।। ८ ।।
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आरती
आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत | मनु वेधला माझा || धृ ||
लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || आरती ज्ञानराजा || १ ||
कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो | साम गायन करी || आरती ज्ञानराजा || २ ||
प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले || आरती ज्ञानराजा || ३ ||
श्री संत मुक्ताई आरती
जयदेवी जयदेवी जय मुक्ताबाई ।।
आदिमाते जननी वादन तवपाई ।।धृ.।।
ब्रह्मा, विष्णू, शिव रूपसी आले ।
निवृती सोपान ज्ञान प्रगटले ।
भगीनी मुक्ताई ब्रह्म चित्कले ।
अवतार धरुनी जग उद्धरीले ।। १ ।।
तापी तटाकवासी श्री चांगदेव ।
ज्ञान बोधुनी त्यासी दिधले वैभव ।
योग्याची ती उर्मी निरसोनी सर्व ।
माया मिथ्था दावी नित्य स्वंयमेव ।। २ ।।
निरंजनी विज कडाडली पाही ।
मनुजेचे तिरी अदृश्य होई ।
जलधारा स्वरूपे वाहे तव ठायी ।
तेथे अधिष्ठान तुका म्हणे आता उदार तुं होई ।।
मज ठेवीं पायी संताचिया ।। ३ ।।
श्री संत तुकाराम महाराज आरती
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा |
सच्चिदानंद मूर्ती | पायी दाखवीं आम्हां || धृ ||
राघवें सागरांत | जैसे पाषाण तारिले |
तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकीं रक्षिले || आरती तुकारामा || १ ||
तुकितां तुलनेसी | ब्रम्ह तुकासी आलें |
म्हणोनी रामेश्वरें | चरणी मस्तक ठेविलें || आरती तुकारामा || २ ||
श्री स्वामी समर्थ आरती
जय देव जय देव, जय जय अवधूता ।
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता।। जय देव जय देव॥धृ॥
तुमचे दर्शन होता जाती ही पापे।
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते।
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते।
वैकुंठीचे सुख नाही या परते।।
जय देव जय देव॥१॥
सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा।
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा।
शरणागत तुज होतां भय पडले काळा।
तुमचे दास करिती सेवा सोहळा।। जय देव जय देव॥२॥
मानवरुपी काया दिससी आम्हांस।
अक्कलकोटी केले यतिवेषे वास।
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास।
अज्ञानी जीवास विपरीत भास।। जय देव जय देव॥३॥
र्निगुण र्निविकार विश्वव्यापक।
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक।
अनंत रुपे धरसी करणे नाएक।
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख।। जय देव जय देव॥४॥
घडता अनंत जन्मे सुकृत हे गाठी।
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी।
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी।
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी।। जय देव जय देव॥५॥
प्रार्थना
घालीन लोटांगण, वंदीन चरण | डोळ्यांनी पाहीन रूप तुझे |
प्रेमें आलिंगन,आनंदे पूजीन | भावे ओवाळीन म्हणे नामा ||
त्वमेव माता च पिता त्वमेव | त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविनं त्वमेव | त्वमेव सर्वम मम् देव देव ||
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् ।
करोमि यज्ञम सकलं परस्मै | नारायणायेती समर्पयामि ||
अच्युतं केशवं राम नारायणम् | कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे |
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् | जानकीनायकं रामचन्द्र भजे ||
हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे |
हरे राम हरे राम राम राम हरे हरे | हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा कृष्णा हरे हरे ||
|| मङ्गलमुर्ती मोरया || गणपति बाप्पा मोरया ||